वाल्हे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेला, सोमवार, दि.२९ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांच्या वतीने देण्यात आली आहे.
श्री भैरवनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी कुंभारवाडा येथून देवाचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५ च्या दरम्यान देव देवळात येणार आहेत. यावेळी देऊळवाड्यातील स्वागत कमानी, मंदिर परिसरातील बांधकाम, विद्युत रोषणाई तसेच नयन मनोहारी फुलझाडांची सजावट यंदाच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तर आकाशाला गवसणी घालणाऱ्या मानाच्या कावडी व देवाच्या पालखीचे देखणे रूप अशा विलक्षण दुश्यांचा देखील यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांना साक्षात्कार होणार आहे.
मंगळवार, दि.३० रोजी देवाला मुंडवळी व पोशाख चढवून दैठणकर यांच्या सनई वादनातून सायंकाळी ५ :३० ते ७ या वेळेत देवाच्या हळदीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमानंतर प्रसाद म्हणून देवाचे वाण वाटण्यात येणार आहे. बुधवार दि.१ मे रोजी चैत्र कृष्ण कालाष्टमी हा यात्रेचा मुख्य दिवस असून,पहाटे ४:३० ते ५ दरम्यान महापूजा होऊन,भाविकांसाठी मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे.
यावेळी,श्री भैरवनाथ मंदिरात आरती, महापूजा, अभिषेक दंडवत घेणे, वस्त्र अलंकार तसेच नवस व नवसाची पूर्तता अशा विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात केली जाणार आहे.
दरम्यान,आर्य इव्हेंट्सनिर्मित महेश गायकवाड प्रस्तुत भक्तीगीत, भावगीत व चित्रपट अनोखी मैफिल कार्यक्रम देखील होणार आहे. यानंतर दुपारी देवाचा छबिना आटोपल्यावर देवाला बाशिंग व लग्नाचा पोशाख चढवून मानकरी सालकरी ब्राम्हण पुजारी व असंख्य मान्यवरांच्या साक्षीने ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा सायंकाळी ६. ३४ मिनिटांनी शाही थाटात संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी सचिन आगलावे, सचिनकाका देशपांडे यांनी दिली.
लग्न सोहळ्यानंतर देवाची भाकणूक केली जाणार असून रात्रीच्या वेळी पुन्हा छबिना रंगणार आहे. गुरूवार, दि.२ रोजी सकाळी १० वा. अभिनेत्री होम मिनिस्टर फेम व प्रबोधनकार मेघना झुझम प्रस्तुत, महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत साड छबिना संपन्न होणार आहे. शुक्रवार दि.३ रोजी देवकार्य, सायंकाळी ४ ते ७ छबिना, राञी ७ ते १० ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे.रात्री देवाची वरात काढण्यात येणार आहे.
शनिवार दि.४ मे रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान जंगी कुस्त्या संपन्न होतील. सायंकाळी ७ ते १० गौतमी पाटील ग्रुपच्या कार्यक्रमानंतर, ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, सचिव शशिकांत दाते यांनी दिली.