राहुरी -“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी आईची महती सांगितली जात असली तरी आई- मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दवणगाव येथे घडली. जन्मदात्या वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपाशीपोटी ठेवले. घराबाहेर हाकलून दिले. कृतघ्न मुलगा व दोन सूनांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कल्याण व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
शरद सखाराम भोसले, सविता शरद भोसले, सुनिता दिनेश भोसले (सर्वजण रा.आंबी-दवणगाव, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.
दवणगाव येथे मालनबाई सखाराम भोसले (वय 65, रा.आंबी-दवणगाव) पती, दोन मुलगे व दोन सूना यांच्यासमवेत घरात राहतात.
वयाच्या 65 व्या वर्षीही मालनबाई शेतमजुरी काम करतात. त्या रविवारी (ता.17) दुपारी दोन वाजता रणरणत्या उन्हात शेतमजुरी कामावरून घरी परतल्या. पोटात भूकेचा आगडोंब उसळलेला होता. जेवायला मागितल्यावर मुलगा शरद व दोन सूनांनी शिवीगाळ सुरू केली. तिघांनी लाथाबुक्क्यांनी, चापटांनी मारहाण केली.
घराबाहेर हाकलून दिले. तू पुन्हा घरात आलीस. तर तुला जिवंत सोडणार नाही. असा दम दिला. उपाशीपोटी घराबाहेर पडलेल्या मालनबाईंनी थेट राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आईच्या फिर्यादीवरून मुलगा व दोन सूनांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
=================