डेहराडून – कॉंग्रेस नेते यशपाल आर्य यांनी सोमवारी उत्तराखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची सुत्रे स्वीकारली. मात्र, त्या सोहळ्यापासून पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार दूर राहिले. त्यामुळे उत्तराखंड कॉंग्रेसमधील असंतोष वाढीला लागल्याचे सूचित होत आहे.
उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारत भाजपने सत्ता राखली. त्यामुळे त्या राज्याची सत्ता काबीज करण्याचे कॉंग्रेसचे स्वप्न भंगले. निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलला. तसेच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि उपनेते यांची निवड केली. त्या निवडींवर कॉंग्रेसचे 19 पैकी जवळपास डझनभर आमदार नाराज आहेत.
त्यातील काहींनी आपली नाराजी उघडही केली. मात्र, सर्व काही आलबेल असल्याचे भासवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात आला. कॉंग्रेसच्या उत्तराखंड शाखेने एकजुटीविषयी केलेल्या दाव्याला रविवारी पहिला तडा गेला.
नवे प्रदेशाध्यक्ष करण माहरा यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी कॉंग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित राहिले. तसेच चित्र आर्य यांनी कार्यभार स्वीकारताना दिसले. त्यामुळे कॉंग्रेसमधील खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली.