मुंबई – सलामीवीर फलंदाज जोस बटलरने फटकावलेल्या वादळी शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेतील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 218 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना बटलरने अफलातून खेळी केली. त्याने देवदत्त पडीक्कलसह संघाला 97 धावांची सलामी दिली. पडीक्कल चांगाल खेळत असताना आनावश्यक फटका मारून 18 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार मारुन 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने बटलरला सुरेख साथ दिली.
सॅमसनही विनाकारण फटका मारून परतला. त्याने 19 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा केल्या मात्र, बटलरसह अर्धशतकी भागीदारी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान बटलरने अर्धशतकी पल्ला पार करत शतकाकडे कूच केली. त्याने शेमरन हेटमारला साथीला घेतले व वेगाने धावा केल्या. त्याने यंदाच्या मोसमनातील दुसरे शतक साकार केले. त्याने आपल्या 103 धावांच्या खेळीत 61 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 5 षटकार अशी आतषबाजी केली. तो बाद झाल्यावर मात्र, राजस्थानच्या धावांचा वेग कमी झाला.
एकवेळ 235 ते 240 धावा करतील अशी अपेक्षा असताना त्यांचा डाव 20 षटकांत 5 बाद 217 धावांवर रोखला गेला. हेटमायरने 13 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 26 धावांची खेळी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. कोलकाताकडून सुनील नरेनने 2 गडी बाद केले. त्याला साथ देताना आंद्रे रसेल, शिवम मावी व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 217 धावा. (जोस बटलर 103, संजू सॅमसन 38, देवदत्त पडीक्कल 24, शेमरन हेटमायर नाबाद 26, सुनील नरेन 2-21, आंद्रे रसेल 1-29, शिवम मावी 1-34, पॅट कमिन्स 1-50).