सातारा (प्रतिनिधी) – शाहू क्रीडा संकुलात सायंकाळच्या सत्रात रंगलेल्या कुस्त्यांमध्ये गादी गटामध्ये कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या पैलवानांनी अंतिम फेरीत धडक मारली. 61 किलो गादी गटात कोल्हापूरचा पै. विजय पाटील याने सोलापूरच्या तुषार देशमुखवर 8 विरूध्द 7 गुणांनी मात केली. गादी गटांमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली .
तिसऱ्या दिवशी झालेल्या 61 किलो गादी विभागातील अंतिम फेरीत कोल्हापूर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू विजय पाटील याने सोलापूर जिल्ह्याच्या तुषार देशमुख यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत 8-7 अशा गुणाधिक्याने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर तुषारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत विजय पाटील याने पुणे जिल्ह्याच्या आबा शेडगे याचा 8-2 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत सहज प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत तुषार देशमुख याने साताऱ्याच्या विशाल सुळ याचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
याच गटात कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या आबा शेडगे याने अमरावतीच्या गोविंद कापडे याचा 12-0 अशा मोठ्या गुण फरकाने पराभव करून कांस्यपदक पटकावले. तसेच साताऱ्याच्या विशाल सुळ याने जळगावच्या करण परदेशी याचा 12-2 अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक जिंकले.
85 किलो गादी विभागातील अंतिम फेरीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या बाळू बोडके याने अहमदनगरच्या षिकेश लांडे याचा 10-0 अशा मोठ्या गुणाधिक्याने एकतर्फी पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तर षिकेशला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
86 किलो गादी विभागातील उपांत्य फेरीत अहमदनगरच्या षिकेश लांडे याने कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटील याचा 6-2 अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत नाशिक जिल्ह्याच्या बाळू बोडके याने पुणे शहरच्या अभिजित भोईर याचा 8-2 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
या गटातील कोल्हापूर जिल्ह्याच्या किरण पाटील याने साताऱ्याच्या विशाल राजणे याचा 5-2 अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकावले. तर दुसऱ्या कांस्य पदकासाठी पुणे शहरच्या अभिजित भोईर व पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप यांच्यात झाली. या अत्यंत चुरशीच्या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही कुस्तीगीरांचे समान गुण झाले होते. मात्र, नियमांनुसार अभिजित भोईर याने उच्च कलात्मक गावांच्या गुणांच्या जोरावर प्रतिक जगताप याचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.