मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवसापूर्वी कारागृहात चालताना पडल्याने त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे देशमुख यांची खांद्याची लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
जे जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी, अनिल देशमुख यांना शनिवारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. सध्या ते अस्थिव्यंग विभागात दाखल आहेत. आज त्यांचा एमआरआय येईल. त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल, असेही सापळे यांनी म्हटले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात आला आहे. मात्र देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी ईडीने अटक केलेल्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता.
त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयचा हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनंच सीबीआयनं यांची कारागृहात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळेच केंद्रीय तपासयंत्रणेनं या चौघांचीही कस्टडीत चौकशी करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज केला होता.