मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मुंबई बँकत मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. या अगोदर सहकार विभागाने दरेकर यांच्यावर कारवाई का करू नये, याबाबत नोटीस बजावली होती.
या प्रकरणी सुनावणीला दरेकर हजर न राहता आपल्या प्रतिनिधीमार्फत युक्तिवाद केला. मात्र हा युक्तिवाद समाधानकारक नसल्यामुळे मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले.
१९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.