वेलिंग्टन – एलिसा हिलीचे शतक, रशेल हेन्सची वादळी खेळी व नंतर जोस जेन्सनची अचूक गोलंदाजी यांच्या जोरावर न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 157 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला असून इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी अंतिम लढत होईल. शतकवीर एलिसा हिली सामन्याची मानकरी ठरली.
वेस्ट इंडिजची कर्णधार स्टेफनी टेलरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. तिचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी केली. एलिसा हिली व रशेल हेन्स यांनी संघाला द्विशतकी सलामी दिली. हिलीने शतक साकार केले मात्र, हेन्सला आपले शतक पूर्ण करण्यात अपयश आले.
हिली 129 धावांची खेळी करून बाद झाली. तिने या खेळीत 107 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार व 1 षटकारांची बरसात केली. हेन्स 100 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. या दोघी बाद झाल्यावर एश्ले गार्डनरने निराशा केली. मात्र, कर्णधार लेनिंगने नाबाद 26 व बेथ मुनीने नाबाद 43 धावा करत संघाला त्रिशतकी धावा उभारून दिल्या. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने या षटकांत 3 बाद 305 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शेनेल हेनरीने 2 गडी बाद केले.
आज दुसरा उपांत्य सामना
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना होत आहे. साखळी फेरीत काही पराभव पत्करल्यावरही नंतरच्या सामन्यात सरस कामगिरी करत या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. आता या लढतीत विजेता होणारा संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. या स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यापासून अपराजीत असलेल्या ऑस्ट्रेलियालाच संभाव्य विजेता मानले जात असले तरीही या दोन संघातील विजेता संघ ऑस्ट्रेलियाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.
विजयासाठी 306 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करत ऑस्ट्रेलियाने विजय निश्चित केला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार स्टेफनी टेलरने 48, डेंड्रा डॉटिन व हेली मॅथ्युज यांनी प्रत्येकी 34 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून राहता आले नाही. वेस्ट इंडिजचा डाव 37 षटकांत सर्वबाद 148 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून जोस जेन्सनने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया – 45 षटकांत 3 बाद 305 धावा. (एलिसा हिली 129, रशेल हेन्स 85, मेग लेनिंग नाबाद 26, बेथ मुनी नाबाद 43, शेनेल हेनरी 2-51). वेस्ट इंडिज – 37 षटकांत सर्वबाद 148 धावा. (स्टेफनी टेलर 48, डेंड्रा डॉटिन 34, हेली मॅथ्युज 34, जोस जेन्सन 2-14).