बेंगळुरू – स्टार खेळाडू नवीन कुमार व विजय मलिक यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्लीने यंदाच्या मोसमातील प्रो-कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले. दिल्लीने शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात अत्यंत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावताना पाटणा पायरेट्स संघाचा रोमहर्षक ठरलेल्या लढतीत 37-36 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला.
या सामन्यात पाटणा संघाने चढायांमध्ये दिल्लीपेक्षा जास्त सरस कामगिरी केली होती. मात्र, त्यांना पकड चांगल्या करता आल्या नाहीत. दुसरीकडे दिल्लीच्या नवीन कुमार व विजय मलिक यांनी अफलातून चढाया करत पाटणा संघाचा बचाव निष्प्रभ ठरवला. विजयने 8 चढाई, एक पकड तर 5 बोनस असे एकूण 14 गुण मिळवले. नवीन कुमारने 11 चढाई व 2 बोनस असे 13 गुण मिळवले. या दोघांच्या कामगिरीमुळे दिल्लीने हे विजेतेपद साकार केले. पाटणा संघाच्या सचिन व गुमान सिंग यांनीही सरस खेळ केला मात्र, दिल्लीच्या आक्रमक खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
गेले जवळपास दोन महिने 12 संघांत तब्बल 136 साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल ठरलेले पाटणा पायरेट्स आणि दबंग दिल्ली हे पहिले दोन संघ स्पर्धेच्या आठव्या मोसमाचे विजेतेपद पटकावण्यासाठी लढत होते. डुबकी किंग प्रदीप नरवालच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाटणा पायरेट्सने यंदा त्याच्या दर्जानूरुप कामगिरी झालेली नसतानाही अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य सामन्यात पाटणा पायरेट्सने युपी योद्धा संघाचा पराभव केला होता व त्याचवेळी त्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणूनही पाहिले जात होते. दुसऱ्या उपांत्य लढतीत दिल्ली दबंगने विजयी घोडदौड कायम राखत बेंगळूरु बुल्सचा पराभव करत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.