इटावा: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपालसिंह हे पाच वर्षांच्या दुराव्यानंतर आज इटावा येथे प्रथमच एकत्र प्रचार करताना दिसले. या आधी ऑक्टोबर 2016 मध्ये या दोघांसह समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव हे येथे एकत्र प्रचार करताना शेवटचे दिसले होते, पण आता मात्र शिवपाल आणि अखिलेश यांच्यात चांगले मनोमिलन झाल्याचे मतदारांना पाहायला मिळाले आहे.
2016 मध्ये कौटुंबिक वादामुळे अखिलेश यांनी काका शिवपाल यांना समाजवादी पक्षाचा बाहेरचा दरवाजा दाखवला होता. शिवपाल यांनी पुढे प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया) हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष राज्यात एकही जागा जिंकू शकला नव्हता.
शिवपाल सिंह यादव यांचा पक्ष आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत समाविष्ट झाला आहे. अखिलेश आणि शिवपाल यांच्यात भाजपच्या विरोधात गेल्याच वर्षी मनोमिलन झाले होते. दोघांनीही राज्याच्या सत्तेवरून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तथापि त्यानंतर हे दोन्ही नेते कधीही एकत्र स्टेज शेअर करताना दिसले नव्हते.
एकेकाळी सपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इटावामध्ये अखिलेश यादव आणि शिवपाल या दोघांनी केवळ एकत्र मंचच शेअर केला नाही तर एकमेकांची स्तुतीही केली. अखिलेश म्हणाले, “काकांच्या (शिवपाल सिंह यादव) पुनरागमनामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमची शक्ती मजबूत होईल आणि यूपी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात आम्हाला मदत होईल.