नवी दिल्ली – ‘आप’चे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि “आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत केजरीवाल यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल हे पंजाबातील फुटीरवाद्यांना सहाय्य करत होते, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. हा आरोप खरा की खोटा हे केजरीवालांनी सांगावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही आपण केजरीवाल यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत असल्याचे म्हटले आहे. या आरोपांना केजरीवाल उत्तर का देत नाहीत, असा प्रश्न राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांचे प्रत्युत्तर
या आरोपांवरून अडचणीत सापडलेल्या केजरीवाल यांनी ट्विटरवरून या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व भ्रष्ट मंडळी आपल्याला जगातील सर्वात पहिला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मग दिल्लीमध्ये शाळा, हॉस्पिटल कोणी उभारले? दिल्लीतील विजेचा प्रश्न कोणी संपवला? असा प्रतिप्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. आपण जगातील सर्वात गोड दहशतवादी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटिश भगत सिंगांना घाबरत असत, म्हणून त्यांना ब्रिटिश दहशतवादी म्हणत असत. मी भगतसिंगांचाच शिष्य आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.