घोडेगाव – शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर विचार आहे. शिवसैनिकांची संघटना असून या पक्षात कष्ट करणाऱ्यांना चांगले दिवस येतात, मंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्ह्यात गावपातळवर जावून संघटना बळकट करण्याचे मोठे काम केले आहे. त्याचे हे काम कौतूकास्पद असून त्यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा निधी मिळवून प्रलंबित विकास कामांना चालणार दिल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख होते. त्यानंतर आयोजित शिवसंवाद मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, सुहास वहाडणे, सभापती प्रा. काशीनाथ दाते, सुरेखा गव्हाणे आदींसह जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शिवसैनिकांनी गावपातळीवर काम करून संघटना बळकट करावी. पक्षाच्या मंत्री व कार्यकर्त्यांनी सरकारची कामे घराघरात पोहचवून केलेल्या कामांचे श्रेय द्यावे.मंत्री गडाख यांच्यासारखे नेतृत्व मिळाले असल्याने नगर जिल्ह्यात शिवसेना बळकट झाली आहे. शाखाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुखांनी समन्वय ठेवून काम करावे,पक्षाचा आवाज बुलंद करावा.शिवसैनिक हा रडका नसून तो लढावु असला पाहिजे असे मंत्री पाटील म्हणाले.
मंत्री गडाख म्हणाले की, हाडाच्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेवासा तालुक्यासह, नगर जिल्ह्यातील पाणी योजनांना मंत्री पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली. शिवसेना वाढविण्यासाठी शिवसंवाद अभियान कायम सुरू ठेवू जिल्ह्यात कुणाचाही विरोध असला तरी शिवसेना वाढवू नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतंर्गत एकाच वर्षात 1100 ते 1200 कोटी रुपये किंमतीचे कामे सुरू आहेत. यात शिवकालीन, निजामकालीन व इतर जुन्या पुरातन बंधाऱ्यांची दुरुस्तीचा धडक कार्यक्रम सुरू केला आहे. असे मंत्री गडाख म्हणाले. प्रास्ताविक संदेश कार्ले यांनी केले.