3,596 नागरिकांच्या हरकती आणि सूचना
पुणे – पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सोमवार अखेर 3 हजार 596 हरकती नोंदवण्यात आल्या असून, सोमवारी एकाच दिवसात त्यातील 2 हजार 804 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. या हरकती आणि सूचनांवर 24 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
पुणे महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत 173 जागांसाठी प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, 57 त्रिसदस्यीय आणि एक द्विसदस्यीय प्रभाग असणार आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये अगदी सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला आहे. आपल्याला अनुरूप प्रभागासाठी प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे आरोप झाले. यानंतरही 6 डिसेंबरला महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्या स्तरावर बदल सुचवले आणि प्रत्यक्षात केलेही आहेत.
यानंतरही हरकती आणि सूचनांसाठी देण्यात आलेल्या कालावधीत 3 हजार 596 नागरिकांनी 2 हजार 804 हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. प्रभाग रचना करताना मुख्यत्त्वे नैसर्गिक सीमारेषा, ओढे, नाले, मोठे रस्ते, डोंगर, नदी असा विचार केला जातो. मात्र यावेळी तो केला गेला नसल्याची अनेकांची तक्रार आहे. याशिवाय प्रभाग रचना करताना प्रामुख्याने राज्यातील विरोधकांनी त्यांच्या पूर्वीच्या प्रभागांची अगदी चार ते पाच प्रभागांमध्ये तोडफोड करून भौगोलिकदृष्टया चुकीची रचना केल्याचीही अनेकांची तक्रार आहे.
सर्वाधिक हरकती वानवडीतून
सर्वाधिक हरकती आणि सूचना वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे (1034) आल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाकडे (12) आल्या आहेत. निवडणूक कार्यालयाकडेही 1 हजार 295 हरकती आणि सूचना गोळा झाल्या असून, त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडे वर्ग करण्यात येतील. वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयापाठोपाठ धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे 289 हरकती आल्या असून, यापैकी 246 हरकती या आज शेवटच्या दिवशी दाखल झाल्या आहेत.