नगर – नगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची येत्या 18 फेब्रुवारीला निवड होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेने या पदावर दावा केला आहे.
स्थायी समितीच्या नूतन 9 सदस्यांची निवड 11 फेब्रुवारीला महासभेत करण्यात आली. त्यानंतर सभापती निवडीसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. मंगळवारी (दि. 15) सकाळी नाशिक विभागीय आयुक्तांनी सभापती निवडीची तारीख जाहीर केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 18) सकाळी 11 वाजता स्थायी समिती सदस्यांची विशेष सभा होणार आहे. या सभेत ही निवड केली जाईल. स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5, शिवसेनेचे 5, भाजपचे 4 तर कॉंग्रेसच्या व बसपाचे प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिले अडीच वर्ष भाजपची सत्ता होती. त्या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेसही सहभागी होती. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या महापौर निवडीत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येवून शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर झालेला आहे. या दोन्ही सत्ताकाळात राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे स्थायी समितीवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिलेले आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीचाच सभापती करण्याच्या हालचाली सुरू असून यामध्ये कुमार वाकळे यांचे नाव आघाडीवर आहे.
स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांची समिती सदस्यत्वाची मुदत वर्षभर शिल्लक असताना त्यांनी सभापती पदाचा तसेच समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा हा राजीनामा कुमार वाकळे यांना सभापती करण्यासाठी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारी (दि.16) सुरूवात होणार आहे. बुधवार व गुरूवार दोन दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत सभापतिपदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत.दाखल अर्जांची छाननी शुक्रवार (दि. 18) विशेष सभेत होणार आहे.