अकोले -अकोले तालुक्यातील भंडारदरा जवळील वारंघुशी गावामध्ये जन्मदात्या बापाचा मुलाने खून केल्याची घटना घडली. आरोपी फरार झालेल्या राजूर पोलिसांनी एका पडक्या घरात लपलेल्या मुलाला ताब्यात घेतले आहे. सदर घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
अकोले तालुक्यातील वारंघुशी गावामध्ये काळु रामदास घाणे याने आपले वडील रामदास लक्ष्मण घाणे यांना काठीने मारहाण करत मारुन टाकले व प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी दोरीला दगड बांधुन विहीरीत टाकुन दिले. सदर घटना ही शनिवारी घडली. सविस्तर वृत्त असे की रामदास घाणे यांना तीन मुले व तीन मुली आहेत. एक मुलगा त्यांच्या बहिणीकडे असतो. दुसरा मुलगा हा नारायण गाव येथे कामाला गेलेला होता. तर तिसरा मुलगा काळु हा दारु पिऊन घरीच होता.
शनिवारी रामदास घाणे व त्यांची पत्नी आपल्या प्रसुतीसाठी आलेल्या मुलीला तपासण्यासाठी नाशिक येथे गेले होते. नाशिक येथुन आल्यानंतर रामदास घाणे यांना आपल्या चार शेळ्या व एक बोकड न दिसल्याने त्यांची चौकशी काळु याच्याकडे केली. त्यावेळी बकऱ्या ह्या विकुन टाकल्याचे काळुने सांगितले. या कारणावरुन बाप- लेकांमध्ये भांडणे झाली.काळुने जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने रामदास यांना मारहाण केली.लाकडाचा वर्मी घाव बसल्याने रामदास यांचा मृत्यु झाला.
रामदास याच्या मयत झालेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने रामदासच्या पोटाला दोरखंडाने मोठा दगड बांधला व घरापासुन जवळच असलेल्या विहीरीत मृतदेह विहीरीत टाकुन दिला. आपल्या आई व बहिणीला जर तोंड उघडले तर तुमचे पण तेच हाल करील अशी धमकी देत गप्प केले. नारायणगाववरुन रामदास यांचा मोठा मुलगा घरी आल्यानंतर त्यावेळी त्याने आपले बाबा दिसत नाहीत, कुठे आहेत? असा प्रश्न घरच्यांना विचारल्यानंतर बाबा विहीरीत असल्याचे सांगितले गेले.
तेव्हा काळुने केलेल्या कृत्याची उकल झाली.या घटना राजूर पोलीस स्टेशनला तात्काळ कळविल्यानंतर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. सदर मृतदेह गुरुवारी सकाळी विहीरीतून वरती काढण्यात आला असुन शवविच्छेदन करण्यासाठी राजूर येथील ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पो.हे.दिलीप डगळे व पो.कॉ.अशोक काळे करीत आहेत.