राहाता – शिर्डी विमानतळ ते बाह्यवळण रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 195 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण आणि आ. विखे पाटील यांच्यासह विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, अभियंता पी. बी. भोसले, अधिक्षक अभियंता एस. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, जागतिक बॅंकेचे एन. एन. राजगुरू, एस. डी. वसईकर, एस. आर. वर्पे या प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 195 कोटी रुपयांच्या निधीस हिरवा कंदील मिळाला आहे.
मागील अर्थसंकल्पात राज्य सरकराने शिर्डी आणि परिसरातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी 135 कोटी रुपये आणि कोऱ्हाळे ते शिर्डी या बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र नगर- मनमाड या राज्यमार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्याने राज्य सरकारने मंजूर केलेला निधी तसाच पडून होता.या मंजूर निधीचा विनियोग व्हावा यासाठी आ. विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिर्डी विमानतळ ते बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे असा प्रस्ताव दिला होता. तसेच भूसंपादनासाठी मंजूर झालेला 60 कोटी रुपयांचा निधीही पुरेसा नसल्याने या निधीचा उपयोगही चौपदरीकरणासाठी करण्यात यावा आशी विनंती आ. विखे यांनी मंत्री चव्हाण यांना केली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री चव्हाण यांनी या संपूर्ण प्रस्तावाची माहिती बैठकीत जाणून घेतली. पुर्वी रस्त्यासाठी तसेच भूसंपादनासाठी मंजूर झालेला 195 कोटी रुपयांचा निधी आता चौपदरीकरणासाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. आ. विखे यांच्या प्रस्तावास मंत्री चव्हाण यांनी मान्यता दिल्याने वाहतुकीसाठी चौपदरीकरणाचा रस्ता विकसित होईल, असा विश्वास आ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. या चौपदरीकरणामुळे शिर्डी आणि परिसरातील गावांच्या विकासालाही अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.