लंडन – जगभरात एकीकडे कोरोनाच्या वाढता संसर्ग पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे ब्रिटन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी देशात मास्क परिधान करण्यासह इतर निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे.
जॉन्सन म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आधीच उच्चांक गाठला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आता कोविड निर्बंध उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
असे असणार वातावरण
– लोकांना यापुढे घरून काम करण्यास सांगितले जाणार नाही
– मास्कचा अनिवार्य वापर करण्याचा नियम सरकारकडून रद्द
– लोक मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार
– लवकरच शालेय वर्गातही मास्क घालण्याच्या नियम हटवण्यात येणार
मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की बूस्टर डोसची मोहीम आणि सावधगिरीच्या उपायांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता, पुढील आठवड्यापासून निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, असे जॉन्सन यांनी संसदेत सांगितले.