सौरव गांगुलीनंतर त्याच्या कुटुंबातील चार सदस्यही करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये त्याची मुलगी सना गांगुलीचाही समावेश आहे. करोनाची लागण झालेल्या सर्व सदस्यांना घरामध्येच विलगीकरण करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी सौरव गांगुलीलाही करोनाची लागण झाली होती त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीला करोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झाली होती. परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे याची पुष्टी झालेली नाही. गांगुलीचा भाऊ देबाशीष गांगुली, मुलगी सना गांगुली, सुवरोदीप गांगुली आणि जस्मिन गांगुली यांना करोनाची लागण झाली आहे.
गांगुली करोनामधून बरा झाला असून तो आता घरीच आहे. त्याचवेळी त्यांची मुलगी सना हिलाही करोनाची लागण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनाला करोनाची सामान्य लक्षणे आहेत. आठवडाभरापूर्वी सना गांगुली आणि तिच्या आईची करोना चाचणी करण्यात आली होती त्यावेळी दोघांचाही करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.