मुंबई : देशभरात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ आणि ‘जलसा’ या बंगल्यात काम करणाऱ्या सेक्युरिटी गार्ड, माळी व इतर कर्मचाऱ्यांच्या रुटीन टेस्ट करण्यात येतात.
यामध्ये 31 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीएमसी कडून मिळाली आहे. या दोन बंगल्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण हा माळी म्हणून काम करतो. या रुग्णाला कुठलीही लक्षणं दिसत नाहीत.
सध्यातरी बच्चन कुटुंबिय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात नसल्याने बच्चन कुटुंबिय सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. बीएमसी कडून सॅनिटायजेशन व इतर खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
गेल्या वर्षी 11 जुलैला अमिताभ यांना करोनाची लागण झाली होती. त्यांना नानावटी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन हे जवळपास एक महिना नानावटी रूग्णालयात उपचार घेत होते. चार दिवसांनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अमिताभ यांची नात आराध्याला देखील करोनाची लागण झाली होती.