माउंट मौनगानुई : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील 16 वा कसोटी सामना नुकताच पार पडला. बांग्लादेशला गेल्या 15 सामन्यात न्यूझीलंडला एकदाही हरवता आले नव्हते. मात्र बुधवारी बांग्लादेशने इतिहास घडवला. त्यांनी न्यूझीलंडला पराभूत करत, कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरात न्यूझीलंडला, न्यूझीलंडमध्ये पराभूत करणारा बांग्लादेश पहिला आशियाई देश ठरला. यासोबतच न्यूझीलंडचा आपल्या भूमीवर सलग 17 सामने अजिंक्य राहण्याचा विक्रमही मोडला.
1. 32 सामन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये पहिला विजय
बुधवारची सकाळ बांगलादेशसाठी ऐतिहासिक ठरला. बांग्लादेशने तब्बल 32 सामन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील पहिला विजय मिळवला.
2. प्रथमच 8 फलंदाज खेळले 50 पेक्षा जास्त चेंडू
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बांग्लादेशच्या आघाडीच्या आठ फलंदाजांनी 50 हून अधिक चेंडू खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच बांगलादेशच्या पहिल्या आठ फलंदाजांनी एकाच डावात 50 हून अधिक चेंडूंचा सामना केला.
3. चार वर्षांत न्यूझीलंड पहिल्यांदा पिछाडीवर
या सामन्याच्या पहिल्या डावात बांग्लादेशने 130 धावांची आघाडी घेतली होती. 2017 च्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पिछाडीवर पडावे लागले आहे.
यापूर्वी बांग्लादेशने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकदाच 130 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली होती. त्यांनी गेल्या वर्षी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध 192 धावांची आघाडी घेतली होती.
4. ऑस्ट्रेलियाशी बरोबरी
बांग्लादेशने 2010 पासून न्यूझीलंडमध्ये चार वेळा एका डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी अशी कामगिरी फक्त ऑस्ट्रेलियाला जमली होती. ऑस्ट्रेलियाने 2010 पासून चार वेळा न्यूझीलंडमध्ये 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यापैकी तीन वेळा त्यांनी 500 पेक्षा जास्त धावाही केल्या आहेत.
5. आशिया खंडाबाहेर दुसर्यांदा 150 षटके फलंदाजी
बांग्लादेशने या सामन्याच्या पहिल्या डावात 176.2 षटके फलंदाजी केली. बांग्लादेशने आशिया खंडाबाहेर 150 पेक्षा जास्त षटके फलंदाजी करण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 152 षटके फलंदाजी केली होती.