काबूल – अफगाणिस्तानमदील तालिबान शासनाने आता शहरातील पुतळ्यांचीही मुंडकी उडवण्याचा फतवा काढला आहे. कपड्यांच्या दुकानांबाहेर उभे केलेल्या मानवी आकृत्यांचे आणि पुतळ्यांचाही शिरच्छेद करण्याचा फतवा तालिबानने काढला आहे. हेरात प्रांतातील दुकानदारांसाठी अशा आशयाचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
“दुकानांबाहेरील मानवी आकृत्यांना धड असता कामा नये.’ असे या निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारे मानवी आकृत्या आणि पुतळे उभे करणे हे शरीया कायद्याच्या विरोधात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यापासून जो निर्बंधांचा वरवंटा फिरवला जातो आहे, त्याचेच विकृत रुप या निमित्ताने बघायला मिळते आहे, असे अफगाणिस्तानमधून प्रसिद्ध होणाऱ्या माध्यमांनी म्हटले आहे.
या फतव्यापूर्वी हेरात प्रांतातील दुकानदारांनी अशा प्रकारे मानवी आकृत्या प्रदर्शित करू नये, असा फतवाही काढण्यात आला होता. मात्र सततच्या युद्धग्रस्त वातावरणामुळे व्यवसायिक नुकसान होत असल्याने अशा प्रकारच्या पतव्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता या मानवी आकृत्यांची मुंडकी उडवण्याचा फतवा तालिबानने काढला आहे.
या मानवी आकृत्या म्हणजे मूर्त्या आहेत. त्यामुळे त्यांना उभे केले जाता कामा नये, असे सद्गुण वर्तनाच्या मंत्रालयाचे प्रमुख शेख अझिज उल रेहमान याने म्हटले आहे. मात्र जरी मानवी आकृत्यांची मुंडकी उडवली तरी त्यामुळेही व्यवसायिक नुकसान होऊ शकते, असा दावा व्यवसायिकांनी केला आहे.