थिरूवनंतपूरम – एका पत्रावर स्वाक्षरी करत नसल्याने कॉंग्रेसचे हाय-प्रोफाईल नेते शशी थरूर स्वपक्षीयांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यातून पक्षाचे केरळमधील नेते उघडपणे थरूर यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत.
केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने सेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. मात्र, तो प्रकल्प अव्यवहार्य असल्याची भूमिका त्या राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीने घेतली आहे. त्यातून केरळमधील विरोधी आघाडीचे खासदार केंद्र सरकारला एक पत्र पाठवणार आहेत. मात्र, त्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास थरूर तूर्त राजी नाहीत. प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतरच मी माझे मत बनवेन. काही मुद्द्यांवर राजकीय मतभेद दूर ठेवणेही गरजेचे आहे, असे थरूर यांचे म्हणणे आहे.
एवढेच नव्हे तर, त्यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांची प्रशंसाही केली. त्यामुळे केरळमधील कॉंग्रेस नेते थरूर यांच्यावर नाराज झाले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी जाहीर टीकास्त्र सोडताना थरूर यांना पक्षशिस्त शिकण्याचा सल्ला दिला. तर, थरूर यांची भूमिका तपासून कॉंग्रेस निर्णय घेईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी.सतीशन यांनी म्हटले.