नवी दिल्ली – देशामध्ये ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने थंडी पडण्यास उशिर झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत तापमनात घट होत असल्याचे दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात उत्तर भारतातील अनेक राज्यात थंडी जाणवू लागली असून पारा घसरला आहे.
उत्तर भारतातील राज्यांच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. चंदीगड आणि उत्तर राजस्थानमध्ये 18 डिसेंबरपासून थंडीची लाट येण्याची शक्यता आयएमडीने दिली आहे.
पंजाबमध्ये 20 डिसेंबरपर्यंत आणि हरियाणा, चंदीगढ आणि उत्तर राजस्थानमध्ये 18 ते 20 डिसेंबर 2021 पर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 2-3 दिवसांत किमान तापमान 2-3 अंशाने घसरण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस म्हणजेत जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.