नवी दिल्ली –पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्या राज्यात नवी आघाडी उदयास आली आहे.
अमरिंदर यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब प्रभारी गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर दोघांनी आघाडीची औपचारिक घोषणा केली.
योग्यवेळी जागावाटप जाहीर केले जाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पंजाबमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीआधी त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या. कॉंग्रेसने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतल्याने अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.
पद सोडावे लागल्याने नाराज झालेल्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. तसेच, पंजाब लोक कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. आता तो पक्ष भाजपचा नवा मित्र बनला आहे. पंजाबमधील जुना मित्र शिरोमणी अकाली दल (एसएडी) भाजपपासून आधीच दुरावला. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवत एसएडीने भाजपबरोबरचे संबंध तोडले.