नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील बाहुबली माजी खासदार अतिक अहमद यांची आठ कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अहमद सध्या विविध आरोपांखाली कारागृहात आहेत.जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये काही जमिनी आणि बॅंकेतील रकमेचा समावेश आहे.
ही मालमत्ता अतिक अहमद आणि त्यांची पत्नी शिएस्ता परवीन यांच्या नावावर आहे. ईडीच्या लखनौ विभागाने मनि लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्यांचे बॅंकेत एकूण 1 कोटी 28 लाख रूपये होते तेही जप्त करण्यात आले आहेत.
59 वर्षीय अहमद हे सध्या गुजरात मधील साबरमतीच्या कारागृहात आहेत. त्यांच्यावर उत्तरप्रदेश सरकारने गॅंगस्टर कायद्यान्वयेही कारवाई केली आहे. त्यांची त्यांच्या मतदार संघात मोठी दहशत आहे. लोकांना धाक दाखवून त्यांनी बराच पैसा उकळला असल्याचाहीं त्यांच्यावर आरोप आहे.