नवी दिल्ली : जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेचे वातावरण निर्माण केले असताना आता देशाची राजधानी दिल्लीला धडकी भरली आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच ओमायक्रॉन व्हेरिएंटने भारतात प्रवेश केला होता. कर्नाटकमध्ये दोन करोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर गुजरात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे करोनाबाधित सापडले आहेत. त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला करोना रुग्ण आढळल्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांची देशातील संख्या आता पाचवर गेली आहे.
First Covid Omicron case in Delhi after Tanzania returnee tests positive; 5th in India
Read @ANI Story | https://t.co/xrgeZal3K5#COVID19 #OmicronVariant pic.twitter.com/0iTLAvQSXx
— ANI Digital (@ani_digital) December 5, 2021
टांझानियामधून आलेल्या प्रवाशांमध्ये हा रुग्ण आढळला असून गंभीर बाब म्हणजे भारतात आलेले एकूण १७ परदेशी प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सगळ्यांचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे किंवा नाही, याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“दिल्लीत पहिला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो नुकताच टांझानियामधून परतला होता. आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या एकूण १७ लोकांची करोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.