हडपसर – हडपसर गाव येथील शंभर वर्षे जुने असलेले पुरातन विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, मंदिराचा परिसर आणि कळसाचा जीर्णोद्धार नगरसेवक योगेश ससाणे यांच्या वतीने स्वखर्चाने करण्यात येत आहे. सीमा भिंत, काँक्रीटीकरण, स्वछतागृह आणि कळस यांच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे चाळीस लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती योगेश ससाणे यांनी दिली.
अंदाजे शंभर वर्षे पुरातन असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे हडपसरवासीयांचे श्रध्दास्थान आहे. मंदिर जुने असल्याने येथील दुरुस्तीची आवश्यकता होती. तसेच माजी नगरसेवक स्वर्गीय दत्तोबा ससाणे यांची या मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी इच्छा होती. त्यामुळे एका कर्तृत्ववान पित्याच्या तितक्याच कर्तबगार पुत्राने हडपसरकरांना दिलेली ही मोठी भेट आहे. अशी भावना मंदिर परिसरातील भक्तांनी व नागरीकांनी व्यक्त केली आहे.
‘हडपसर येथील हे विठ्ठल मंदिर खुप जुने आहे. हे श्रद्धास्थान असल्याने त्याचा जीर्णोद्धार करणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेकडे निधी मागितला होता. मात्र तो त्यांनी दिला नाही. तेव्हा स्वखर्चाने सुमारे चाळीस लाख रुपयांचा खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.
सध्या सीमा भिंतीचे काम सुरू आहे. लवकरच संपूर्ण परिसरात काँक्रीटीकरण करणे, तीन दरवाजे मोठे करणे, स्वागत कमान करणे, येणाऱ्या भाविकांसाठी स्वछतागृह तसेच कळस जीर्णोद्धार करण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्ट च्या परवानगीने हे काम केले जात आहे.’
– योगेश ससाणे (नगरसेवक, हडपसर)