मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सह्याद्रीच्या कुशीत असणारा ‘रायगड’ फक्त किल्ला नव्हे तर मराठ्यांचा स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा… रायगड म्हणजे ‘दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज’. असा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तुफान सरी बरसल्या.
स्वर्ग 🚩👑#रायगड pic.twitter.com/Re5ve34D9f
— Prathamesh Taware (@mr_pratham12) December 1, 2021
स्वराज्याची राजधानी असणाऱ्या राजगडावर सुद्धा असाच तुफान पाऊस झाला आहे. रायगडवरचा पाऊस अनुभवने म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या सरी… हा अनुभव स्वतः गेल्याशिवाय कळत नाही आणि अनुभवता सुद्धा येत नाही. पण हाच अनुभव काल अनेकांनी घेतला आहे.
सोशल मीडियावर पावसामध्ये रायगडवरच्या राजसदरे वरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणी काढला हे अद्याप समोर आलं नाही. पण या व्हिडिओमध्ये मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा हा तर अगदीच मोहक दिसतोय. खरोखर पावसाळ्यामध्ये किल्ल्यावरील हे दृष्य डोळ्याचं पारणं फेडणार आहे.