पुणे- राज्यस्तरीय खेळाडू असल्याबाबतच्या बनावट प्रमाणपत्रे तयार केली. त्या आधारावर २०१५-१६ सहायक पोलीस उपनिरीक्षक रेडिओ यांत्रिकी) पदी नियुक्ती झालेल्या एकावर चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश नवनाथ करांडे रा. बीड) असे त्याचे नाव आहे. विभागीय चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर बनावट प्रमाणपत्र तयार करणे, तो प्रमाणपत्र वापरात आणून शासनाची फसवणूक केल्याल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
करांडे हा सध्या बीड येथील बिनतारी संदेश विभागात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. २०१५-१६ मध्ये अपर पोलीस महासंचालक व संचालक, दळण वळण व परिवहन कार्यालयातर्फे रेडिओ यांत्रिकी विभागाची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या प्रक्रियेत करांडे याने २०१२ मध्ये झालेल्या राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांक पटकावल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले.
महाराष्ट्र स्क्रॅश स्केट्स असोसिएशन २०१५ च्या स्पर्धेतील औरंगाबाद जिल्ह्याकडून खेळलेले प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र आणि २०१५ मध्येच स्क्रॅश स्केट्स असोसिएशनचे बीड जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते.. संबंधित स्पर्धेच्या आयोजकांकडे पाठपुरावा केल्यानंतर तपास करण्यात आला.