* शहरातील 73 हजार नागरिकांचा सहभाग
* 64 हजार किलो कचरा संकलित
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी आज (दि. 21) प्लॉगेथॉन मोहीम आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शहरातील 32 प्रभागातील 64 ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
सांगवी येथील पोलीस चौकीपासून महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. “माझी वसुंधरा’ शपथ घेऊन शहर स्वच्छतेचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेचा मंत्र या विषयावर आधारित नाटिका लहान विद्यार्थ्यांनी सादर केली. महात्मा गांधी, संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.
सांगवी पोलीस चौकी ते साई चौक दरम्यानचा रस्ता तसेच पीडब्ल्यूडी मैदानावरील कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या मोहिमेमध्ये संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कचऱ्यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार आहेत. त्याचे प्रात्यक्षिक मोहिमेच्या प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच कचरा विलगीकरण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत होते.
महापौर ढोरे यावेळी म्हणाल्या, देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. निरंतर शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्लॉगेथॉन उपक्रमाला आपण सुरुवात केली आहे. प्लॉगेथॉन मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी केल्याबद्दल पक्षनेते नामदेव ढाके आणि आयुक्त राजेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच शहर स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले योगदान देत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
थेरगाव आणि पिंपळे सौदागर येथे आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता करत परिसरातील कचरा संकलित करण्यात आला. तसेच भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. निगडीमध्ये नगरसेविका कमल घोलप यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छता केली.
आकुर्डीमध्ये निसर्ग दर्शन हाऊसिंग सोसायटी ते संजय काळे ग्रेड सेपरेटर दरम्यान स्वच्छता करण्यात आली. चिंचवड येथील मोरया रुग्णालय येथेही उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच चिखली आणि मोशीमध्ये अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत प्लॉगेथॉन मोहीम पार पडली. दिघी येथे उपमहापौर हिराबाई घुले यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पालिकेचे कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.