सिंचन पुनर्स्थापना खर्चाच्या चौथ्या हप्त्याची रक्कम
पिंपरी – आंद्रा धरणातून पाणी आरक्षणापोटी महापालिकेने सिंचन पुर्नस्थापना खर्च म्हणून आतापर्यंत तीन हप्त्यात पाटबंधारे विभागाला 60 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम अदा केली आहे. आता चौथ्या हप्त्यामध्ये 20 कोटी 16 लाख तसेच उर्वरित पाणीपट्टीची अनामत रक्कम म्हणून 22 लाख 4 हजार रुपये अशी एकूण 20 कोटी 38 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.
शहरात सध्या दिवसाआड सुमारे 520 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. तर, एमआयडीसीच्या माध्यमातून 30 दशलक्ष लिटर इतके पाणी देण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर जाऊन पोहचली आहे. शहराच्या नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे.
अशा परिस्थितीत पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिकेकडून आंद्रा व भामा आसखेड धरणातून एकूण 267 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सध्या महापालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. आंद्रा धरणातून बिगर सिंचन 36.87 दलशक्ष घनमीटर पाणी आरक्षणापोटी महापालिकेने सिंचन पुर्नस्थापनेसाठी 100 कोटी 80 लाख रुपये इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे.
समान पाच टप्प्यांत रक्कम
2018-19 पासून ही रक्कम पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने समान हप्त्यात भरायची आहे. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत 2018-19, 2019-20 आणि 2020-21 अशा एकूण तीन हप्त्यांमध्ये 60 कोटी 48 लाख रुपये इतकी रक्कम पाटबंधारे विभागाकडे जमा केली आहे. त्याशिवाय, दोन महिन्यांची पाणीपट्टीची अनामत रक्कम आणि जलमापन यंत्रासाठी अशी एकूण 22 लाख 33 हजार रुपयांची रक्कम पाटबंधारे विभागाला अदा केलेली आहे.
दरम्यान, 2021-22 या वर्षासाठी सिंचन पुर्नस्थापनेसाठी चौथ्या हप्त्याची रक्कम म्हणून 20 कोटी 16 लाख तसेच उर्वरित पाणीपट्टीची 22 लाख 4 हजार रुपये इतकी अनामत रक्कम पाटबंधारे विभागाला दिली जाणार आहे. पुढील वर्षी पाचव्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे.