अॅमस्टरडॅम – नेदरलँडमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लाॅकडाऊनला देशाच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. उट्रेच शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. दंगल नियंत्रक पोलिसांनी आंदोलकांना पांगवले. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.
नेदरलँडमधील सरकारी टीव्ही वृत्तवाहिनी ‘एनओएस’ने वृत्त दिले आहे की, अॅमस्टरडॅमपासून 140 किमी अंतरावर असलेल्या लेउवॉर्डनमधील स्त्यावर नागरिकांनी लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर दंगल नियंत्रक पोलिसांनी निदर्शनकर्त्यांना पांगवले. यावेळी पोलिसांवर काही नागरिकांनी दगडफेक केली. येथील उट्रेचमध्ये घालून दिलेल्या वेळेनंतरही शहरातील बार उघडे होते.
– लॉकडाऊन स्वीकारणे कठीण
आंदोलक म्हणाले, ‘लॉकडाऊन स्वीकारणे फार कठीण आहे. हे खूप वाईट आहे. लाॅकडाऊनमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. नोकऱ्या गेल्या, लाखो लोक बेरोजगार झाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे आता लाॅकडाऊन लागू करू नये.
दरम्यान, देशातील सुमारे 85 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु गुरुवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 24 तासात 16,364 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत येथे 18,600 हून अधिक लोकांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशाचे पंतप्रधान मार्क रूट यांनी शुक्रवारी तीन आठवड्यांच्या आंशिक लॉकडाउनची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लोकांचा जीव वाचवणे हे महत्वाचे असल्याने लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.