कोल्हापूर – केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. त्याचबरोबर काही राज्यांनी देखील त्यांच्या पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. माझे चॅलेंज आहे, असा दावाच चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला होता. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असं सांगतानाच इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कपटी नाही. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असं पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारनंतर आता महाराष्ट्रानेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले पाहिजे. 14 राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. 2024 ला काय करायचे ते जनता ठरवेल, असेही पाटील म्हणाले.