पुणे : डॉक्टरच्या बंगल्यात खिडकीद्वारे प्रवेश करून त्यांना आणि पत्नीला चाकुचा दाखवून हातपाय बांधून 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा दरोडा टाकल्याप्रकरणात मुख्य सूत्रधाराचा जामीन सत्र न्यायाधीश जे.एन.राजे यांनी फेटाळला. तो गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे.
9 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्याकडे आणखी मुद्देमाल असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास करणे गरजेचे आहे. जामीन दिल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.
विजय चंद्रप्रकाश पटेल (वय 26, रा. वल्लभनगर, मूळ. मध्य प्रदेश) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. लोणावळा येथील प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या बंगल्यात हा दरोडा टाकण्यात आला होता. त्यांनीच याबाबत लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात एकुण 22 जणांवर गुन्हा दाखल आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांचाही गुन्ह्यात समावेश आहे. ही घटना 17 जून 2021 रोजी लोणावळा येथील खंडेलवाल रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील बंग़ल्यात घडली. त्यापैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पटेल याने जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर तो फेटाळण्यात आला.