मुंबई – भारतीय संघाच्या मेंटॉरपदी नियुक्त करण्यात आलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एक रुपयाही मानधन घेणार नसल्याचे सांगितले आहे, असा खुलासा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केला आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा संपल्यावर दोनच दिवसांत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून धोनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी धोनी मोठ्या रकमेचे मानधन घेणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, या वृत्ताचे शहा यांनी खंडन केले असून धोनीने केवळ संघाच्या सरस कामगिरीसाठी माझी मदत देणार असल्याचे सांगत मानधन घेण्यास नकार दिला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले होते. एक कर्णधार म्हणून कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आजवर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही.
हा दुष्काळ संपवण्यासाठी बीसीसीआयने ज्या काही रणनीती आखल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मदतीला धोनीला मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. धोनीने गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.