MS Dhoni Case : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांमधील वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. यापूर्वी धोनीच्या वतीने त्याच्या व्यावसायिक भागीदारांविरुद्ध 15 कोटी रुपयांच्या नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर माजी साथीदारांनीही धोनीवर गुन्हा दाखल केला आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने रजिस्ट्रीला धोनीला याबाबत ईमेल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मेलद्वारे धोनीला कळवले जाईल की त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांनी त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
धोनीचा माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धोनी विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दिवाकर आणि दास यांनी धोनीसह त्याच्या वतीने काम करणाऱ्या लोकांना 2017 च्या कराराच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात त्यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश मागितले आहेत.
धोनीने का केलाय फसवणुकीचा आरोप
याआधी धोनीने त्याच्या दोन जुन्या व्यावसायिक भागीदारांवर फसवणुकीचा आरोप केला होता. धोनीने तक्रारीत लिहिले होते की, त्याला क्रिकेट अकादमी उघडण्याचे कंत्राट मिळणार होते, परंतु ते त्याला दिले गेले नाही आणि त्याचे 15 कोटी रुपये हडप करण्यात आले. आरोपात म्हटले आहे की 15 ऑगस्ट 2021 रोजी एमएस धोनीने अधिकार रद्द केल्यानंतरही मिहिर दिवाकरने भारताच्या माजी कर्णधाराच्या नावाचा वापर करून भारतात आणि परदेशात अनेक क्रिकेट अकादमी उघडल्या. एमएस धोनी क्रिकेट अकादमी आणि एमएस धोनी स्पोर्ट्स अकादमीसाठीही त्याने फ्रँचायझींकडून पैसे घेतले. धोनीच्या माजी व्यावसायिक भागीदाराने त्याच्या नावाचा गैरवापर केला. त्यांची फसवणूक केली. याच कारणामुळे धोनीने त्याच्यावर गुन्हा दाखल करत 16 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
एमएस धोनीने अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,मिहिर दिवाकर संचालक आणि सौम्या दास संचालक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 406, 420,467,468,471 आणि 120B अंतर्गत जिल्हा न्यायालय रांची येथील सक्षम न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.