मुंबई – उत्सवाच्या काळात लोकांनी घराची खरेदी करावी यासाठी स्टेट बॅंकेने व्याजदरासह घरासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. स्टेट बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार जर ग्राहकाचे कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड चांगले असेल तर घरासाठी कितीही रकमेचे कर्ज घेतले तरी व्याजदर 6.70 टक्क्यापासून सुरू होतील. याअगोदर जर घरासाठी 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेतले असेल तर व्याजदर 7.15 टक्के इतका होता.
आता स्टेट बॅंकेने दिलेल्या सवलतीमुळे कितीही रकमेच्या घरासाठीच्या कर्जासाठीचा व्याजदर 6.70 टक्क्यापासून सुरू होईल. त्याचा अर्थ ग्राहकाला व्याजदरात 0.45 टक्क्यापर्यंत लाभ होणार आहे. त्यामुळे ग्राहकाने 30 मुदतीचे 75 लाख रुपयापर्यंतचे घरासाठीचे कर्ज घेतले असेल तर आठ लाख रुपये वाचतात.
या अगोदर बिनपगारदार ग्राहकाला घरासाठीच्या कर्जासाठी 0.15 टक्के अधिक व्याजदर द्यावा लागत होता. आता या ग्राहकांनाही पगारदार ग्राहकाइतकाच व्याजदर लागणार आहे. त्यामुळे पगारदार नसलेल्या या ग्राहकांना व्याजदरात 0.15 टक्क्याचा फायदा होणार आहे.
यासंदर्भात बोलताना स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सी एस शेट्टी यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे कर्जाची रक्कम किती आहे यावर व्याजदर ठरवले जातात. मात्र आम्ही आता ही वर्गवारी काही काळ बंद केली आहे.
त्याचबरोबर विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळे व्याजदर लावले जात होते. ती वर्गवारी आता बंद केली आहे. स्टेट बॅंकेने हेही स्पष्ट केले आहे की, उत्सवाच्या काळामध्ये घर कर्जासाठी प्रोसेसिंग फी लागणार नाही. व्याजदरात सवलत आणि शुन्य प्रोसेसिंग फीमुळे उत्सवाच्या काळामध्ये भारतात जास्तीत जास्त ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतील असे स्टेट बॅंकेला वाटते.