तीन दिवसात गुंतवणूकदार झाले 4.46 लाख कोटींनी श्रीमंत

मुंबई – तीन दिवसापासून शेअर बाजाराचा निर्देशांक वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात वाढ होत आहे. तीन दिवसात गुंतवणूकदाराकडील शेअरचे मूल्य तब्बल 4.46 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

गेल्या तीन दिवसापासून खरेदी वाढल्यामुळे निर्देशांक वाढत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स प्रथमच 59 हजार अंकाच्या पुढे गेला आहे. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्‍स 993 अंकांनी वाढल आहे. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य तीन दिवसात 4.46 लाख कोटी रुपयांनी वाढून 260 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.

या घडामोडीबद्दल स्वास्तिक इन्वेस्ट मार्ट या संस्थेचे संशोधन प्रमुख म्हणाले की गेल्या अनेक महिन्यापासून सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी एकतर्फी वाढत आहेत. ही तेजी एकूणच पुढील दोन ते तीन वर्ष कायम राहण्याची शक्‍यता आहे. दरम्यानच्या काळात काही छोटे, मोठे करेक्‍शन होऊ शकते. सप्टेंबर महिन्यामध्ये निर्देशांक 60 हजारांपर्यंत वाढवू शकतो. मात्र ऑक्‍टोबर महिन्यामध्ये काही प्रमाणात करेक्‍शन होऊ शकते.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमा यांनी सांगितले की, जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असले तरी भारताच्या आगामी काळातील विकास दरावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

त्यातच केंद्र सरकार अनेक आघाड्यावर महत्त्वपूर्ण सुधारणा करीत आहे. केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये खर्च वाढला आहे. दूरसंचार आणि वाहन क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यासाठी बॅड बॅंकेची स्थापना केली जात आहे. यामुळे सर्वच क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. बॅड बॅंकेच्या स्थापनेमुळे गुरुवारी बॅंकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.