राजुरीतील चिमुकल्यावर पुण्यात उपचार : घटनास्थळी लावला पिंजरा
बेल्हे (वार्ताहर) – राजुरी (ता. जुन्नर) येथील गव्हाळी मळ्यामधील एका लहान तीन वर्षाच्या बालकाला बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
वेद अक्षय चासकर असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो अंगणात खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला उसाच्या शेतात फरफटत नेले. मुलाचा मोठा रडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. स्थानिक नागरिकांनी उसाच्या शेतात घेराव घालून मोठा आरडाओरड केला.
मोठा आवाज आल्याने बिबट्याने मुलाला शेतात सोडून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी या जखमी बालकाला आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते; परंतु जखमा मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्याने त्यस पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवले आहे. याठिकाणी वनविभाग दाखल होऊन पिंजरे लावले आहे.
वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या परिसरात 4 पिंजरे लावले आहेत. तसेच दिवस रात्र वनविभागाची गस्त सुरू आहे. बालकाची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये 3 कर्मचारी आहेत. वनविभागाकडून कुटुंबीयांना उपचारासाठी म्हणून तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल. नागरिकांनी काळजी घ्यावी व रात्री घराबाहेर पडू नये.
-योगेश घोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर