कारखान्यावरच होणार सीएनजी निर्मिती
रेडा – शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर यावर्षीच्या गळीत हंगामापासून सीएनजी गॅसवर धावणार आहेत. राज्यातील साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहेत. नीरा भीमा कारखान्यावर सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
मांजरी बुद्रुक पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावर्षीपासून नीरा भीमा कारखान्याचे ऊस वाहतूकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर प्रायोगिक चालणार चालविले जाणार आहेत. राज्यात नीरा भीमासह एकूण 5 साखर कारखान्यांमध्ये सीएनजी गॅसवर प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅक्टर चालविण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरच्या इंधन खर्चात सीएनजी गॅस वापरामुळे 50 टक्के बचत होणार आहे. ऊस वाहतुकीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येणार आहे.
बैठकीस व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्य अधिकारी संभाजीराव कडू-पाटील, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्रा. एस. व्ही. पाटील, केंद्र सरकारच्या मध्यवर्ती रस्ते वाहतूकचे अधिकारी राजेंद्र सानेर-पाटील, विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, नीरा भीमा कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन.मरकड, के. ए. गायकवाड आदी उपस्थित होते.
नीरा भीमावर यंदा देशातील पहिला बायो प्रकल्प
नीरा भीमा कारखान्यामध्ये यावर्षीपासून बायोमासवर आधारित देशातील पहिला बायोसीएनजी गॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरसाठी लागणारा सीएनजी गॅस हा कारखान्यावर उपलब्ध होणार आहे. भविष्यात इंदापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्यासाठी सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे कारखान्याचे धोरण आहे.