पुणे : अन्नदात्याला सरकारच जगू देईना…

पुणे- यंदा टोमॅटो, हिरव्या मिरच्यांच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या मागणी कमी आणि आवक जास्त असे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून काही दिवसांपासून घाऊक बाजारात टोमॅटो आणि हिरव्या मिरच्यांच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी मात्र प्रचंड अडचणीत आले आहेत.

दरम्यान, “उत्पादित टोमॅटो महाराष्ट्र सरकारने विकत घ्यावीत. त्यातून होणारा तोटा भरून देण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्‍के भार उचलेल,’ अशी घोषणा यापूर्वीच झाली आहे. मात्र, दोन्ही सरकारांनी याबाबत काहीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे अन्नदाता शेतकरी मात्र यातून भरडून निघत आहे.

“सुमारे पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या भावाची घसरण सुरूच आहे, तर हिरव्या मिरच्यांचे भाव मागील आठवडाभरापासून घटले आहेत. मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला प्रतिकिलो 8 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. तर मध्यम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलोला 5 रुपये भाव मिळत आहे. हिरव्या मिरच्यांना प्रतिकिलोला 5 ते 8 रूपये भाव मिळत आहे.आवक अशीच सुरू राहिल्यास भावात वाढ होण्याऐवजी आणखी घटच होईल,’ अशी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

यावेळी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटो आणि हिरव्या मिरच्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाव गडगडले आहेत. बाजारात हिरव्या मिरच्यांची रोज 7 ते 8 गाड्यांची आवक राज्य आणि परराज्यातून होत आहे, तर पुणे विभागातून टोमॅटोची 5 ते 6 गाड्यांची आवक होत आहे. शहरात अद्यापही करोनाचे सावट आहे. त्यामुळे खानावळी, हॉटेलवर मर्यादा आहेत. यामुळहीे मागणीत अद्याप वाढ झाली नसल्याचेही घुले म्हणाले.

दरम्यान, केंद्र शासनाने यापूर्वी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

वाटाण्याचे भाव समाधानकारक
राज्य-परराज्यांतून वाटाण्याची बाजारात आवक होते. मात्र, पुरंदरचा वाटाचा चवीसाठी प्रसिद्ध आहे. सद्य:स्थितीत बहुतांश प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या भावात मोठी घट झाली असली, तरी पुरंदरच्या वाटाण्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला 60 ते 70 रुपये भाव मिळत आहे. हेच भाव आणखी काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.