22 हजार रुग्णांच्या बिलांत 17 कोटींची वाढीव रक्कम कमी
पुणे (प्रतिनिधी) -जादा बिले आकारू नये, असे आदेश राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या या आदेशाला खासगी हॉस्पिटल केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 21 हजार 967 रुग्णांच्या बिलामधील 17 कोटी 34 लाख रुपयांची वाढीव रक्कम कमी करण्यात आली आहे.
खासगी हॉस्पिटल करोना रुग्णांकडून जादा बिले उकळत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने उपचारांसाठीचे दर निश्चित केले. तर खासगी हॉस्पिटलनी दिलेल्या एक लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांचे पूर्व तपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी दोन्ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली.
एक लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरिक्षण पथकाला दिले जाणार जाते. या बिलांचे तपासणी केल्यानंतर जादा दर आकारले असेल तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाते. हे बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते. यामध्ये ही बाब समोर आली.
पुणे जिल्ह्यात वाढीव बिलाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 21 हजार 967 तक्रारी आल्या. या सर्व बिलांची छाननी लेखा पथकांकडून केली. त्यामध्ये 17 कोटी 34 लाख रुपयांचे जादा बिल रुग्णालयाने आकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही बिले कमी केली आहे. दरम्यान, जादा बिले आकारण्या हॉस्पिटलकडील बिले लेखा पथकाकडून तपासणी कमी करून दिली जात आहे. मात्र वारंवार वाढीव बिले देणाऱ्या हॉस्पिटलवर प्रशासनाकडून कारवाई होत नाही