पुणे – आपत्ती व्यावस्थापन कायद्याचे कारण पुढे करत दररोज दहा लाखांचा दंड वसूल करण्याचे आदेश देणाऱ्या उपायुक्त माधव जगताप यांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, हा आदेश समोर येताच महापौरांच्याया आदेशानुसार, उपायुक्त जगताप यांनी सुधारित आदेश काढत; 10 लाखांच्या वसुलीचा उल्लेख नजरचुकीने झाल्याचे म्हटले होते.
करोना प्रतिबंधक उपाय योजनातंर्गत मास्क न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांवर व व्यवसायिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
मात्र, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना लेखी फतवा काढून करोना नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला.
आयुक्तांची खुलासा नोटीस मिळाली आहे. जे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले होते, त्यामध्ये दररोज 10 लाख रुपये दंड गोळा करण्याचा उल्लेख नजरचुकीने झाला होता, हे यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यानुसार खुलासा केला जाईल.
– माधव जगताप, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग