वॉशिंग्टन – काबूल विमानतळावर येत्या 24 ते 36 तासांत आणखी एक हल्ला होण्याची शक्यता आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. ही माहिती अत्यंत खात्रीशीर असल्याने विमानतळानजिक कोणत्याही अमेरिकन नागरीकांनी थांबू नये किंवा त्यांनी तो भाग तेथून सोडून जावा, अशी सूचना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेही केली आहे.
शनिवारी बायडेन यांनी या स्थितीच्या संबंधात निवेदन करताना म्हटले आहे की, काबूल परिसरातील स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. विमानतळावर आणखीनच हल्ल्यांची शक्यता आहे. अमेरिकेच्या कमांडरने आपल्याला सांगितले आहे की, पुढील 24 ते 36 तासांत तेथे पुन्हा एक मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. अध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातील आपल्या अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अमेरिकन नागरीकांच्या सुरक्षेसाठी कसल्याही स्वरूपाची मदत तयार आहे, आपण आपल्याला जे गरज असेल त्याचा त्वरेने वापर करा, अशी सूचनाही अध्यक्ष बायडेन यांनी काबूलमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना केली आहे. गुरूवारी झालेल्या हल्ल्याशी संबंधीत लोकांवर हल्ले सुरूच ठेवण्याच्या सूचनाही बायडेन यांनी दिल्या आहेत.
या हल्ल्याशी संबधीत असलेल्या प्रत्येकाला शोधून त्यांना संपवण्याचे स्पष्ट आदेशही अध्यक्षांनी दिले आहेत. दरम्यान या सगळ्या गडबडीत अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच आहे. आजच्या माहितीनुसार अफगाणिस्तानात अजूनही 350 अमेरिकन नागरिक आहेत. काल तेथून एकूण 6800 जणांना हलवण्यात आले आहे.