पुणे : गेल्या दशकभरात शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हजार कोटींची बिआरटी, जवळपास हजार कोटींचे उड्डाणपूल आणि तेवढयाच कोटींचे स्मार्ट रस्ते आणि पदपथ उभारल्यानंतर शहरातील वाहतूक समस्या कायम असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी महिन्याला तब्बल 2 लाखांचे मानधन देऊन महापालिका शहरासाठी ट्रॅफिक प्लॅनर ( वाहतूक नियोजनकार) नेमणार आहे. या सल्लागाराची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली जाणार असून त्याला तब्बल 72 लाखांचा खर्च महापालिका करणार आहे. विशेष म्हणजे या सल्लागाराला दिले जाणारे वेतन हे महापालिका आयुक्तांच्या वेतनापेक्षाही अधिक असणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शहराच्या वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र अधिकारी आणि विभाग असतानाही या एका पदासाठी एवढ्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या अट्टाहासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरात खासगी वाहनांची संख्या 30 लाखांच्या घरात गेली आहे. त्यात, कमी म्हणून शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे बोकाळली आहेत. तर ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या नावाखाली रस्त्यांचे रूंदीकरण करून स्मार्ट पदपथ, सिंग्नल तसेच स्मार्ट शहराच्या नावाखाली महापालिकेने अर्बन स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत सुमारे 150 किलोमीटरचे रस्ते विकसन करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर 200 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे, तर सुमारे 1 हजार कोटींचे रस्ते पीपीपी मधे विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे, अद्यापही शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे, तर प्रायोगिक तत्वासह शहराच्या इतर भागात उभारलेल्या बीआरटी प्रकल्पासाठी आता पर्यंत हजार कोटींच्या वर खर्च केल्यानंतरही रस्ते रूंदीकरण, उड्डाणपूलामुळे केवळ 30 टक्केच बीआरटी अस्तित्वात आहे. मात्र, हे सगळे नियोजन करताना सल्लागारांना या प्रकल्पांसाठी कोटयावधीचा निधी मोजल्यानंतर आता शहरातील वाहतूक कोंडी सुटत नसल्याचा साक्षात्कार झाल्याने महापालिका प्रशासनाने आता ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी हे पालिकेने या पदासाठी दोन वेळा जाहीरात काढली होती. मात्र, त्यात केवळ सहा महिन्यांची मुदत या पदासाठी होती. मात्र, त्यासाठी प्रतिसाद न आल्याने तीन वर्षे मुदतीसाठी हे पद भरले जाणार असून त्याबाबतची जाहीरात नुकतीच काढण्यात आली आहे.
ही करणार कामे
महापालिकेने प्रकाशित केलेल्या जाहीरातीनुसार, या सल्लागार 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसेच त्यांनी शहरासाठी अंतर्गत वाहतूक व्यवस्थापन करायचे असून बीआरटी प्रणाली, शहरातील रस्त्यांचे नेटवर्किंग, शहरातील रस्त्यांची डिझाईन त्या संलग्न इतर पायाभूत सुविधांचा अभ्यास करून त्यानुसार, महापालिकेस वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सल्ला द्यायचा आहे. विशेष म्हणजे,याच कामासाठी महापालिकेने वाहतूक नियोजन अधिकारी हे स्वतंत्र पद नियुक्त केले असून ते कार्यरतही आहे. तसेच त्यासाठी स्वंतंत्र विभाग असून या विभागाच्या माध्यमातून ही सर्व कामे केली जात आहेत .