पुणे – कोविशिल्ड लसीचे जादा डोस पुण्याला देण्याची सीरम इन्स्टिट्यूटची अजूनही तयारी आहे, पण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला.
पुण्याला कोविशिल्डचे जादा डोस देण्याची तयारी आहे, असे सीरमचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितले. फक्त याकरिता केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. पूनावाला यांची तरी ऐकून भाजपचे स्थानिक नेते हलतील का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी महापौरांना पत्र पाठविले आणि केंद्र सरकारची परवानगी घ्यावी, असे सुचविले. याला प्रतिसाद न देता महापौरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. लसीकरणाचे महत्त्व ओळखा आणि सीरमचे जादा डोस मिळवा, असे आवाहन मी केले होते, भाजप नेते याबाबत गंभीर दिसत नाहीत, असे जोशी म्हणाले.