पॅरिस : सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील एकूण १२ राष्ट्रपमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि एका राजाचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांच्या यादीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करत असते. दरम्यान पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपला मोबाइल आणि मोबाइल क्रमांक बदलला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेगॅसस प्रकरणविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आलेला हा पहिला मोठा निर्णय आहे.
“त्यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेचा भाग आहे,” असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं आहे. सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी पेगॅसस प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे.
एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता. २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.