वडगाव मावळ, -जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा करोनामुळे यावर्षी रद्द करण्यात आला आहे. परंतु तीर्थक्षेत्र देहूगावात संत तुकोबारायांच्या पादुकांची पूजा करण्यात येत आहे. गुरुवारी देहूगावात संत तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान करण्यात आले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची पायी आषाढी वारी शासनाने रद्द केली आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर महाराजांच्या पादुका देहूतील देऊळवाड्यातील भजनीमंडपात ठेवण्यात आल्या आहेत.
मात्र, संस्थानतर्फे वारीतील दैनंदिन महापूजा, धार्मिक विधी केले जात आहेत. गुरुवारी पालखी सोहळ्याचा 15 वा दिवस होता. या दिवशी वारीच्या वाटेवर सराटी गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी तुकोबारायांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाते. मात्र, यंदा हा कार्यक्रम देहूतच हरिनामाच्या गजरात पार पडला.