वॉशिंग्टन – अमेरिका हा पुढारलेल्या विचारांचा आणि आचाराचा देश मानण्यात येत असला तरी अजूनही तिथे समलैंगिक संबंधांना तेवढ्या प्रमाणात समाज मान्यता नाही. त्यामुळे समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांना धार्मिक आणि इतर सामाजिक व्यवहार करताना अनेक अडचणी येतात.
याच अडचणींवर मात करण्यासाठी अमेरिकेत सुषमा द्विवेदी या भारतीय महिलेने फक्त समलैंगिक लोकांचे पौरोहित्य करण्याचे काम स्वीकारले आहे. मुळात अमेरिकेत महिला पुरोहित मिळणे खूपच दुर्लभ असताना सुषमा द्विवेदी यांनी फक्त समलैंगिक व्यक्तींचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुषमा द्विवेदी यांनी 2016 मध्ये पर्पल पंडित प्रोजेक्ट या प्रकल्पाची सुरुवात केली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून समलैंगिकांच्या मुलांचे बारसे, गृहप्रवेश व्यवसायाची सुरुवात अशा अनेक धार्मिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
या माध्यमातून सुषमा द्विवेदी यांनी आतापर्यंत 33 विवाह लावले असून इतर लोकांसाठीही त्या धार्मिक काम करतात. सुषमा या एका ऑरगॅनिक फूड कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम करतात. त्यांचे पती विवेक जिंदाल हे न्यूयॉर्कमध्ये मॅनेजमेंट कंपनीमध्ये प्रमुख गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करतात.
2013 मध्ये या दोघांचे लग्न झाले तेव्हा सुषमा यांच्या लक्षात आले की पतीचे काही नातेवाईक समलैंगिक आहेत आणि त्यांचे वैवाहिक विधी आणि इतर धार्मिक विधी करणे अडचणीचे ठरत आहे. त्याचवेळी त्यांनी अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.