थिरूवनंतपुरम – लहान मुलांवरील उपचारांसाठी जी औषधे गरजेची आहेत त्या औषधांवरील जीएसटी व आयात कर काढून टाकावा अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या संबंधात त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असून त्यांनी त्यांच्या राज्यातील एका 18 महिन्याच्या मुलाची कहाणीही पंतप्रधानांना या पत्रातून ऐकवली आहे. त्यांनी म्हटले आहे कुन्नुर जिल्ह्यातील एका मुलावर उपचार करण्यासाठीं जी औषधे लागणार आहेत ती अमेरिकेहून मागवावी लागणार असून त्याची किंमत तब्बल 18 कोटी रूपये इतकी आहेत.
इतकी रक्कम मोजणे त्याच्या कुटुंबाला शक्यच नाही. या मुलाला एसपीए म्हणजेच स्पायनल मस्क्युलर आर्थोपीच्या विकारासाठी ही ओैषधे आयात करावी लागणार आहेत. या मुलाला झोलगेंन्समा औषधाचा डोस द्यावा लागणार असून हे औषध जगातले सर्वात महागडे औषध समजले जाते.
दरम्यान मोहंमद नावाच्या या मुलाच्या या उपचारासाठी केरळातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा करून त्याला मदत केली आहे. त्यातून ही मदतीची रक्कम 18 कोटी रूपये जमा झाली असून आता त्यासाठी कोणी पैसे जमा करू नयेत असे आवाहन त्याच्यावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केले आहे.